बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमधील इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. शिफाली संतोष कांबळे हिने राष्ट्रीय स्तरावरील वैयक्तिक नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
बीदर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल लेव्हल डान्स कॉम्पिटिशन’ मध्ये शिफालीने आपल्या बहारदार नृत्याने परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशाबद्दल तिला मान्यवरांच्याहस्ते चषक, प्रमाणपत्र आणि 7000/- रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कोरिओग्राफर कार्तिक प्रियदर्शन यांनी केले. शिफालीच्या या यशाबद्दल शाळेचे एस्.एम.सी. चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर.एस्.पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर, शिक्षक वृंद आणि पालकांकडून तिचे कौतुक होत आहे. तिच्या या यशामुळे सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








