मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (वय ९२) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होती, मात्र नंतर कुटुंबीयांकडून याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. आशा भोसले यांच्यावर सध्या रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, त्यांच्या नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आजीला अशक्तपणा आणि छातीचा संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच चाहत्यांनी आणि माध्यमांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही तिने केले आहे.
आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत बातमी समोर आल्यानंतर विविध तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.








