बेळगाव : मराठी भाषेशी आपली नाळ कायम जपत, वैविध्यपूर्ण साहित्य लेखी स्वरूपात समाजासमोर सादर करणे ही मोठी जबाबदारी आहे. मातृभाषेवर असणारे प्रेम आणि सीमा प्रश्नाबद्दल असणारी आस्था खूप मोठी आहे म्हणूनच आजच्या धावपळीच्या युगात देखील बेळगाव वार्ता “ज्वाला” या दिवाळी अंकाच्या माध्यमातून साहित्याचा खजिना आपल्या वाचकांपर्यंत उपलब्ध करून देत आहे, असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केले.


बेळगाव वार्ताच्या “ज्वाला” या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी नाथ पै सर्कल येथील नेताजी सुभाष सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी मालोजीराव अष्टेकर बोलत होते.
प्रकाशन सोहळ्याला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर तालुका समिती गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी तसेच माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे, जिजामाता सोसायटीच्या संचालिका भारती किल्लेकर, बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन झाले. यानंतर 51 व्या वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या “ज्वाला” या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे संपादक सुहास हुद्दार, कार्यकारी संपादिका शिवानी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना मालोजीराव अष्टेकर यांनी दिवाळी अंकाचे प्रकाशन ही मोठी जबाबदारी असून कै. कृष्णा मुचंडी यांनी सुरू केलेली परंपरा “ज्वाला ने जोपासली आहे. शिवाय नवोदित कवी आणि साहित्यिकांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सीमा प्रश्नाची दखल घेत या अंकात वैविध्यपूर्ण लेख, कविता देखील देण्यात आल्या आहेत असे नमूद केले.
यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे यांनी सीमा प्रश्न ही भळभळती जखम आहे. यामुळे सीमाप्रश्नाशी बांधिलकी जपत आजच्या परिस्थितीत देखील दिवाळी अंक प्रसिद्ध करणे हे मोठे कर्तव्य आहे. दीडशे वर्षाची परंपरा लाभलेले वाचनालय बेळगावात आहे. सीमा प्रश्नाबद्दलचे सर्व दस्ताऐवज या वाचनालयात उपलब्ध असताना देखील अभ्यास न करता लेखन करणे हे चुकीचे असल्याचे मत मरगाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनी प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. एम. गोरल यांनी केले तसेच आभार प्रदर्शन पत्रकार राधिका सांबरेकर यांनी केले. कार्यक्रमाला जाहिरातदार हितचिंतक तसेच वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.








