- सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत वाहनाला अपघात झाला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कारला कॉंक्रिट मशीन वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली.
अपघातावेळी जिल्हाधिकाऱ्यांची कार कार्यालयाच्या परिसरात उभी होती. परिसरात सुरू असलेल्या विकासकामासाठी कॉंक्रिट आणणारे हे वाहन रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटल्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कारला धडक बसली. या अपघातात कारचा पुढील भाग तसेच वाहनावरील बोर्डाला मोठे नुकसान झाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत वाहनाचे नुकसान झाल्यामुळे कार्यालय परिसरातील सुरक्षा आणि वाहन हालचालीबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची चर्चा कर्मचार्यांत सुरू आहे.







