• जत्तीमठ येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय

बेळगाव / प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणात मराठा समाजाने नोंद कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जत्तीमठ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की सर्वेक्षणाच्या फॉर्ममध्ये “धर्म: हिंदू, जात: मराठा, पोटजात: कुणबी, मातृभाषा: मराठी” अशी नोंद करावी. कर्नाटक सरकारतर्फे हे सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

बैठकीत बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले, “या सर्वेक्षणात ‘कुणबी’ असा उल्लेख केल्याने गैरसमज होण्याचे कोणतेही कारण नाही. सीमाभागातील मराठा समाजातील प्रत्येकाने कोणत्याही अटी-निकषांकडे न पाहता फॉर्ममध्ये हिंदू–मराठा–कुणबी–मराठी अशी नोंद करावी. याचा निश्चितच आपल्या पुढील पिढ्यांना फायदा होईल.”

सकल मराठा समाजाचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी सांगितले, “आरक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी सर्वांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून योग्य नोंदी करणे आवश्यक आहे. समाजाच्या ऐक्यासाठी ही बाब फार महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक गावात मराठा बांधवांनी याबाबत जनजागृती करावी.”

क्षत्रिय मराठा परिषद, बेळगावनेही आवाहन केले की सरकारी नोकरीत असो वा राजकारणात मोठ्या पदावर, तसेच कितीही उत्पन्न असले तरी प्रत्येकाने जातीच्या रकान्यात ‘कुणबी’ असा उल्लेख करावा. त्याच धर्तीवर बेळगावमधील सकल मराठा समाजानेही समाजातील सर्वांनी हीच नोंद करण्याचे आवाहन केले आहे. दररोज रंगूबाई पॅलेस येथे या विषयावर सभा घेऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच गुरुवारी मराठा मंदिरात व्यापक बैठक होऊन समाजाला याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या बैठकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय नेते, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी जुने मतभेद विसरून समाजहितासाठी एकत्र येणे. राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाच्या प्रगतीसाठी सर्व नेते एकजुटीने पुढे आलेले पाहून समाजातून समाधान व्यक्त होत आहे. सीमाभागातील मराठा समाजाची एकजूट कायम राहिली, तर तो सर्व स्तरांवर उल्लेखनीय यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील, नागेश देसाई, दत्ता जाधव, किरण जाधव, सुनील जाधव, रवी साळुंखे, नेताजी जाधव, सागर पाटील, अनिल पाटील यांसह मराठा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.