• खासदार जगदीश शेट्टर
  • जिल्हा विकास समन्वय आणि पर्यवेक्षण समितीची बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

जात सर्वेक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासात खंड पडू नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. ते जिल्हा विकास समन्वय आणि पर्यवेक्षण समिती (दिशा) बैठकीत बोलत होते.

खासदार शेट्टर म्हणाले, “जात सर्वेक्षणाची मुदत वाढल्यामुळे शाळांच्या सुट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडत असून शैक्षणिक नुकसान होत आहे.”

यावर जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) लीलावती हिरेमठ यांनी सांगितले की, सर्वेक्षणात प्राथमिक शिक्षकांचा ९८ टक्के वापर करण्यात आला आहे. फक्त शहरी भागात माध्यमिक शिक्षकांची मदत घेतली गेली असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष वर्ग आयोजित केले जात आहेत.

खासदार शेट्टर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी आणखी उपाययोजना करण्याची सूचना केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्राथमिक शिक्षकांसोबत इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही सर्वेक्षणासाठी नियुक्त केल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, बीआयएमएस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केएलईच्या डॉक्टरांकडून सध्या तात्पुरती सेवा दिली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) गडाद यांनी सांगितले. त्यांनी कायमस्वरूपी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी माहिती दिली की, हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून टप्प्याटप्प्याने भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बैठकीला चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, अधिकारी आणि समिती सदस्य उपस्थित होते.