• सकल मराठा समाजाचा निर्णय : जनगणनेतील नोंदींबाबत होणार मार्गदर्शन

बेळगाव / प्रतिनिधी

राज्य सरकारकडून २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाच्या प्रत्येक घटकाची नोंद अचूक व्हावी, यासाठी रविवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचा मेळावा घेण्याचा निर्णय गुरुवारी (१८ सप्टेंबर) जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे होते.

बैठकीत शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. अध्यक्ष मरगाळे म्हणाले की, “जनगणनेत मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबाची योग्य नोंद होणे शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी अत्यंत गरजेचे आहे. या बाबतीत कुटुंबप्रमुखांनी जागरूक राहावे आणि इतरांनाही याची जाणीव करून द्यावी.”

रमाकांत कोंडुसकर यांनी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. “मागील जनगणनेतील त्रुटी पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रत्येकाने दक्ष राहणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

सकल मराठा समाजाचे निमंत्रक किरण जाधव यांनी सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनगणनेत समाजाची पूर्ण नोंद व्हावी यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे सांगितले. “युवक-युवतींनी आपल्या भागात व्यापक जागृती मोहीम राबवावी,” असेही त्यांनी नमूद केले.

ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी जनगणनेचे कायदेशीर महत्त्व आणि भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अचूक नोंदी का गरजेच्या आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी जयराज हलगेकर, रणजीत चव्हाण-पाटील, गुणवंत पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, प्रा. आनंद आपटेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, अंकुश केसरकर, सुनील जाधव, राजेंद्र बैलूर, सागर पाटील, पप्पू कुऱ्याळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • आवाहन :

रविवारी होणाऱ्या या मेळाव्यास मराठा समाजातील तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात या मेळाव्याची माहिती पोहोचवावी, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले.