उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या ऊधमपूर जिल्ह्यातील रामनगर परिसरात खगोट भागात रविवारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काही गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी एअर लिफ्ट करण्याची तयारी करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली.
अपघातानंतर परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








