- ‘शक्ती सामर्थ्य फाउंडेशन’चा अनोखा सामाजिक संदेश
बेळगाव / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी वेगळा आदर्श घालून देत बेळगावमधील ‘शक्ती सामर्थ्य फाउंडेशन’च्या महिलांनी स्मशानभूमी स्वच्छतेचा अनोखा उपक्रम राबवला. आज रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी सदाशिवनगर येथील गणाचारी स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश दिला.

महिला दिन साजरा करण्याबरोबरच समाजात अर्थपूर्ण योगदान द्यावे या उद्देशाने फाउंडेशनच्या सदस्यांनी सदाशिवनगर तिसरा क्रॉस येथील स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. यावेळी परिसरातील वाढलेले तण काढणे तसेच साचलेला कचरा साफ करून स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमात फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका लता बी. अनसकर, संचालिका श्वेता लक्ष्मण महेंद्रकर, सगाई मेरी फ्रान्सिस यांच्यासह कविता के. मुदलियार, जॅसिंथा मुदलियार, नितीन के. मुदलियार, स्वस्तिक मेदार, हृतिक मेदार, किरण कोरडा आणि शोभा घोडके यांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान वॉर्ड क्रमांक २५ चे पर्यवेक्षक संजू मोरे आणि सज्जन सुळेभावी यांनी कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य केले. या निःस्वार्थ सामाजिक उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांकडून फाउंडेशनच्या सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे.








