बिजगर्णी : समाजाप्रती बांधिलकी जपत इतरांच्या गरजा ओळखून सहकार्य केल्यास माणुसकी जिवंत राहते आणि समाजात परस्पर सहकार्याची भावना बळकट होते, असे प्रतिपादन अमूल्य बुंद फाउंडेशनच्या सौ. आरती भंडारी यांनी केले. बिजगर्णी हायस्कूल येथे नूतन स्वच्छतागृह इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
“इतरांना देत राहा, त्यातूनच माणूस मोठा होतो. दिल्यामुळे कृतज्ञतेची भावना निर्माण होते आणि समाजात सकारात्मक बदल घडतो,” असे भावनिक विचार त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील सुमारे ७५ शाळांना भेटी देऊन पाणी उपलब्ध करून देणे, प्लास्टिकमुक्त अभियान राबविणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य फाउंडेशनकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच खरे यश असल्याचेही त्या म्हणाल्या.
बिजगर्णी हायस्कूल येथे आयोजित उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव होते. स्वागतगीत आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी रोटरीचे गव्हर्नर अशोक नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नूतन स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्यात रोटरी क्लबचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळेसाठी बेंच मंजूर करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
अमूल्य बुंद फाउंडेशनतर्फे सौ. आरती भंडारी यांनी स्वखर्चातून सुमारे दीड लाख रुपये खर्च करून हे स्वच्छतागृह बांधून दिले असून, आकर्षक इमारतीचे बांधकाम अभियंता भरमा चोपडे यांनी केले आहे. यानिमित्त पश्चिम विभाग शिक्षण संस्थेतर्फे सौ. आरती भंडारी, अशोक नाईक व भरमा चोपडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, सह्याद्री सोसायटीचे चेअरमन पी. पी. बेळगावकर, मराठा बँकेचे संचालक अशोक कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत देणगीदारांच्या योगदानामुळे समाजात विधायक कार्य घडत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, संस्था सचिव ए. एल. निलजकर, माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध झाल्याने शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. एम. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. आर. पी. सरवणकर यांनी तर आभार ए. एम. दरेकर यांनी मानले.








