• पालकांना दिलासा ; माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील इटगी येथील कन्नड प्राथमिक शाळेचे उच्च माध्यमिक शाळेत रूपांतर करून सुरू केलेला आठवीचा वर्ग गस्टोळी येथे हलविण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक पालकवर्ग व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

इटगी शाळेतील आठवीचा वर्ग दोन वर्षांपासून यशस्वीपणे चालू होता. त्यामुळे तिगडी परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण होत होती. मात्र काही राजकीय हस्तक्षेपामुळे हा वर्ग गस्टोळी शाळेत हलविण्यात आला होता. यामुळे इटगी परिसरातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार होते, त्यामुळे ग्रामस्थ व पालकांनी आंदोलन छेडले. शनिवारी आंदोलन तीव्र झाले आणि ग्रामस्थांनी इटगी बंद ठेवत धरणे आंदोलन सुरू केले.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षण मंत्री मधु बंगाराप्पा यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केली. त्यांनी इटगी शाळेत आठवीचा वर्ग कायम ठेवण्याची गरज अधोरेखित केली. यानंतर शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण आयुक्तांशी संपर्क साधत स्थलांतराचा निर्णय तातडीने रद्द केला.

अंजली निंबाळकर यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे पालक व ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त करत आंदोलन मागे घेतले.