बेळगाव : इस्कॉन चळवळीतील दरवर्षीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या उत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या महोत्सवात रविवारी जन्माष्टमी निमित्त भरगच्च कार्यक्रम झाले.

  • जन्माष्टमी कथा महोत्सव :

गेल्या रविवारपासून इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी जन्माष्टमी कथा महोत्सवात रोज भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावरील कथा सांगितल्या.

पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्यांनी श्रीमद् भागवतातील 60 व्या अध्यायावर कथाकथन केले. या अध्यायात भगवंत सांगतात की ,”मला प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे “माझे नित्य दर्शन करणे, माझ्याबद्दल श्रवण, कीर्तन करणे, भक्तांच्या संगतीत राहणे,  वगैरे वगैरे.

शुक्रवारी म्हणजे स्वातंत्र्य दिनादिवशी प.पू. भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी श्रीमद् भागवतातील दहाव्या गणितातील 61 व्या अध्यायावर कथाकथन केले. यावेळी त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या कुटुंबाबद्दल ची माहिती दिली. भगवंतांच्या 16,108 राण्या होत्या पण त्यापैकी प्रमुख राण्या आठ होत्या त्या प्रत्येक राणीला दहा मुलगे व एक मुलगी होती. असे सांगून महाराज पुढे म्हणाले की,” श्रीकृष्णांच्या मुलांची संख्या 1 लाख 61 हजार होती आणि त्या प्रत्येकाची लग्न झाल्याने त्यांना प्रत्येकी दहा मुले झाली अशा पद्धतीने श्रीकृष्णांच्या परिवारात 16 लाखापेक्षा जास्त सदस्य होते. भगवंतांनी प्रत्येक राणीसाठी वेगळा महल बांधला होता आणि प्रत्येक राणी बरोबर ते स्वतंत्ररीत्या राहायचे. हे केवळ भगवंत असल्यामुळेच त्यांना शक्य होते.

“भगवंताप्रति श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी आपण भक्तांच्या संगतीत राहावे लागते कारण संग हा अतिशय महत्त्वाचा आहे.” असे सांगून ज्या ज्या वेळी मनुष्याला राग येतो तेव्हा मनुष्याने जप केला तर त्याच्या जीवनात शांती येऊ शकेल असेही ते म्हणाले.

भक्तांनी तयार केलेल्या गाईशी संबंधित वस्तूंच्या एका बॉक्सचे अनावरण महाराजांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या बॉक्समध्ये जपमाळा, धूप, गोमूत्र, गोबर काड्या, महामंत्र व मोरपंख यांचा समावेश असून हा बॉक्स इस्कॉनच्या मॅचलेस गिफ्ट या दालनांत उपलब्ध आहे

  • पार्किंग ग्राउंडवर व्यवस्था : 

दरवर्षी मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन यावर्षी प्रथमच जन्माष्टमी चे कार्यक्रम मंदिराबरोबरच मंदिरा मागील पार्किंग ग्राउंड वर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात घेण्यात आले. त्यामध्ये सकाळी आरती, शृंगार दर्शन ,भागवत प्रवचन ,दिवसभर भजन, कीर्तन आणि सायंकाळी दीक्षित भक्तांचे अभिषेक झाले. त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून पुढे देणगीदारांचे अभिषेक झाले. अनेक देणगीदारांनी अभिषेकाचा लाभ घेतला. इस्कॉनचे भक्त विष्णुप्रसाद यांनी बसवलेली श्रीकृष्णांच्या जीवनावरील नाट्यलीला सादर करण्यात आली. त्यानंतर प.पू .भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे श्रीकृष्ण जन्मावर विशेष कथाकथन झाले आणि रात्री बारा वाजता महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

  • सोमवारी व्यासपूजा

इस्कॉन चे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असतो त्यामुळे इस्कॉन चळवळीत तो दिवस व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात येतो. हाही कार्यक्रम मंदिराच्या मागील बाजूस उभारलेल्या मंडपात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. अनेक भक्तांच्या वतीने श्रील प्रभुपाद यांच्या जीवनावर गुणगान केले जाणार असून प. पू. भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे