• इंधन दरवाढ व हॉटेल्स बंद झाल्याने भाजीपाल्याची वाहतूक ठप्प
  • उलाढाल निम्म्यावर ; व्यापारी – शेतकरी चिंतेत

बेळगाव / प्रतिनिधी

इराण–इस्राईल युद्धाचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठांवरही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम बेळगाव येथील एपीएमसी भाजी मार्केटवर झाला आहे. इंधन दरवाढ, गॅस सिलिंडरची टंचाई आणि राज्याबाहेरील हॉटेल्स बंद पडल्यामुळे भाजीपाल्याची वाहतूक विस्कळीत झाली असून भाजीपाला व्यापारात मोठी घट झाल्याने व्यापारी आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असलेल्या बेळगाव एपीएमसीमध्ये दररोज गोवा, महाराष्ट्र आणि मंगळूरसह विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठवला जातो. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दर वाढले असून गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे त्या भागातील अनेक हॉटेल्स आणि कॅन्टीन बंद पडली आहेत. परिणामी भाजीपाल्याची मागणी कमी झाली असून वाहतूक साखळी विस्कळीत झाली आहे.

या परिस्थितीचा परिणाम एपीएमसीच्या व्यवहारावरही झाला आहे. साधारणपणे दररोज सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या भाजी मार्केटमध्ये आता ती केवळ एक कोटी रुपयांवर आली आहे. म्हणजेच व्यापार जवळपास पन्नास टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मेहनत घेऊन पिकवलेल्या भाज्यांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असून विक्री न झालेला भाजीपाला कुजण्याची वेळ येत आहे.

एपीएमसी भाजीपाला घाऊक विक्रेते संघटनेचे संचालक सतीश पाटील यांनी याबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पुरवठा टंचाई आणि इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या नाहीत तर भाजीपाला उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.