• आमदार यशवंतरायगौडा पाटील

विजयपूर / दिपक शिंत्रे

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे जुलै १४ रोजी सकाळी ११ वाजता इंडी येथील पोलीस परेड मैदानावर इंडी विधानसभा मतदारसंघातील विविध विभागांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करावी, असे सूचनांचे आदेश इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पूर्वतयारी बैठकीत आमदार बोलत होते. त्यांनी सांगितले की, इंडी व चडचण तालुक्यांतील १९ जलाशय भरण्याची योजना, जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामे, इंडी शहरातील नवीन श्री सिद्धेश्वर भव्य व्यावसायिक संकुल बाजार, डॉ. बी. आर. आंबेडकर मेट्रिकपूर्व मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम, प्रगती कॉलनीतील सीसी रस्ते, होर्ती गावातील वसतिगृहासाठी अतिरिक्त खोल्या आणि पायाभूत सुविधा, अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या अंतर्गत मुरारजी देसाई निवासी शाळा, मिरगी गावातील ओढ्यावर पूल-कम-बॅरेज बांधणी, हिरेइंडीतील हनुमान मंदिर ते जलदप्पा तलावापर्यंत ओढा विकास, आळूर गावातील सर्वे नं. १२८ मधील बंधारा, निंबाळ गावातील लघुपाटबंधारे जलाशय विकास, हिरेबेवणूर गावातील इंगु तलाव विकास, हडलसंग गावातील लघुपाटबंधारे तलाव विकास, झळकी व इंडी येथील सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालये, सरकारी माध्यमिक शाळा इमारती, सातारगाव पिआय, इंडी तालुक्यातील ४ अंगणवाडी केंद्रे, अगरखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य अधिकाऱ्यांसाठी वसतिगृहे, झळकी डिप्लोमा कॉलेजसाठी अतिरिक्त खोल्यांची कामे लोकार्पण करण्यात येणार आहेत.

  • पुढील महत्वाच्या योजनांचा भूमिपूजन होणार आहे.
  • होर्ती श्री रेवनसिद्धेश्वर लिफ्ट सिंचन योजना
  • तिडगुंडी शाखा कालव्याचे विस्तारीकरण (कि.मी. ५६.०० ते ६५.५८ पर्यंत)’
  • चडचण-गणगापूर (११५ कि.मी.) रस्त्याचा विकास (इंडी मतदारसंघातील ४८ कि.मी.)
  • पडनूर-अंकलगी भागातील भीमा नदीवरील पूल बांधणी
  • इंडी रेल्वे स्थानक ते हलसंगी राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता सुधारणा (NH-52)
  • औऱाद-सदाशिवगड राज्य महामार्ग क्र.३४ सुधारणा
  • इंडी शहरातील GTTC कॉलेजचे बांधकाम
  • “प्रगती पथ” योजनेतर्गत रस्त्यांचे बांधकाम

संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्यक्रम हाताळावा, कोणतीही अडचण उद्भवू नये आणि प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी नीट पार पाडून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आमदार पाटील यांनी सांगितले. व्यासपीठ, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, शहरातील स्वच्छता, व्यासपीठ सजावट या सर्व बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर मारीहाळ, इंडी उपविभागीय अधिकारी सौ. अनुराधा वस्त्र, आलमट्टी केबीजेएनएलचे मुख्य अभियंता बसवराज, रामपूर केबीजेएनएल मुख्य अभियंता रविशंकर, इंडी DYSP जगदीश, तहसीलदार बी.एस. कडकम्भावी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.