• सौंदत्ती तालुक्यातील नाविलूतीर्थ जलाशय पूर्ण क्षमतेने भरले

सौंदत्ती / वार्ताहर

मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी सौंदत्ती तालुक्याच्या मुनवळ्ळी जवळील नाविलूतीर्थ जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या जलाशयातून अधिक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम घाटात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे, मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळीनजीकचे नाविलूतीर्थ जलाशय पूर्णपणे भरले आहे. जलाशयात पाण्याची वाढलेली आवक लक्षात घेता, धरणाच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांनी नदीत ४,००० क्युसेक पाणी सोडले आहे. सध्या, मलप्रभा नदीत ७,००० क्युसेकपेक्षा जास्त आवक होत आहे. २०७९.५० फूट क्षमता असलेल्या नाविलूतीर्थ धरणात २०७७.३० फूट पाणी जमा झाले आहे.

नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना अनावश्यकपणे नदीजवळ जाऊ नये आणि पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाविलूतीर्थ जलाशय भरल्याने शेतकरी आनंदी आहेत. येणाऱ्या काळात पाण्याची उपलब्धता शेतीच्या कामांसाठी अधिक अनुकूल होईल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.