बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या केडीपीच्या प्रगती आढावा बैठकीत सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे तसेच शिक्षकांच्या समस्या या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.
यावेळी कागवाडचे आमदार राजू कागे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य तो प्रतिसाद न दिल्याबद्दल बीईओंवर टीका केली. तर बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी त्यांच्या मतदारसंघातील सरकारी शाळांना अत्याधुनिक (स्मार्ट) स्वरूप देण्याबाबत सरकारकडून अपेक्षित प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर क्षेत्रीय शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडळाकडून आलेल्या सूचनेनुसार मागितलेली माहिती तातडीने पाठवण्यात आली आहे. ५७ शाळांचे अपग्रेडेशन आधीच पूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमदार आसिफ सेठ व आमदार गणेश हुक्केरी यांनीही ही बाब वेळेवर आमदारांच्या लक्षात न आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना शाळांची यादी तयार करून आमदारांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कागवाडचे आमदार राजू कागे यांनी पुन्हा एकदा सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या किरकोळ पण महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. डीडीपीआयने समाधानकारक उत्तर न दिल्याने, बीईओंनी परिस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांनी मागणी केली.
या बैठकीस बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, आमदार प्रकाश हुक्केरी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.