• वारकऱ्यांना मोठा दिलासा

बेळगाव / प्रतिनिधी

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. हुबळी–पंढरपूर या मार्गावर २९ ऑक्टोबरपासून ३ नोव्हेंबरपर्यंत या विशेष रेल्वे धावणार आहेत. या निर्णयामुळे बेळगाव, खानापूर, लोंडा आणि परिसरातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या विशेष रेल्वेत स्लीपर आणि जनरल अशा दोन्ही प्रकारच्या डब्यांचा समावेश असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होणार आहे.

रेल्वेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :  दि. २९, ३०, ३१ ऑक्टोबर तसेच १, २ आणि ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.१० वाजता रेल्वे हुबळी स्थानकातून सुटेल आणि सायंकाळी ४.०० वाजता पंढरपूरला पोहोचेल. त्याच दिवशी सायंकाळी ६.०० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल आणि रेल्वे पुढील दिवशी पहाटे ४.०० वाजता हुबळी येथे परत येईल.

प्रमुख थांबे : धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, धळगाव, जत रोड, वसूड आणि सांगोला.

या विशेष रेल्वेमुळे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात सुटणार आहेत.