• माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांची मागणी

हल्याळ : कोविडनंतर बंद पडलेली हुबळी–लोंढा–मिरज–पंढरपूर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे केली आहे.

दांडेली दौऱ्यावर आलेल्या मंत्री सोमण्णा यांना दिलेल्या निवेदनात देशपांडे यांनी नमूद केले की, या मार्गावरील रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे उत्तर कर्नाटकातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच विठ्ठल भक्तांची मोठी गैरसोय होत आहे. कोविडपूर्व काळात ही रेल्वे नियमित धावत होती आणि दोन्ही राज्यांतील प्रवाशांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत होती.

पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यात्रा व उत्सव काळात विशेषतः हजारो भक्त या सेवेचा लाभ घेत असत. सेवा बंद झाल्याने धार्मिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक हालचालींवर परिणाम झाला आहे.

ही रेल्वे पुन्हा सुरू झाल्यास कर्नाटक–महाराष्ट्र संपर्क अधिक सक्षम होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि लघुउद्योग व व्यापारालाही फायदा होईल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.