बेळगाव / प्रतिनिधी

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत व्यक्तींना जाळ्यात अडकवून त्यांची लूट करणाऱ्या हनीट्रॅप टोळीचा पर्दाफाश करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात फॅशन डिझायनर असलेल्या दीपा अवटगी (वय ३३, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट) हिला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार शिवानंद मठपती (रा. हुक्केरी) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपा अवटगी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींशी ओळख वाढवत असे. त्यानंतर त्यांना बेळगावमधील एका लॉजवर भेटीसाठी बोलावले जात असे. संबंधित व्यक्ती लॉजवर आल्यानंतर तिला स्नानगृहात जाण्यास सांगून बाहेरून दरवाजा लॉक केला जात असे. या संधीचा फायदा घेत आरोपी रोख रक्कम, मोबाईल तसेच कारची चावी घेऊन फरार होत असत.

या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर प्रकरणाचा तपास वेगाने करण्यात आला. तक्रार दाखल होताच टिळकवाडी पोलिसांनी कारवाई करत दीपा अवटगी हिला अटक केली. सध्या तिला न्यायालयाकडून जामीन मिळाला असून फरार आरोपी शिवानंद मठपती याचा शोध सुरू आहे.

दरम्यान तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ३२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात फॉर्च्युनर कार, मारुती एस-क्रॉस, ११ मोबाईल फोन तसेच रोख रकमेचा समावेश आहे. टिळकवाडी पोलिसांनी हा हनीट्रॅपचा डाव उधळून लावल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.