- १६ विद्यार्थी अत्यवस्थ
चिकोडी / वार्ताहर
चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील अल्पसंख्याक मोरारजी देसाई निवासी शाळेत अन्नविषबाधेची आणखी एक धक्कादायक घटना नोंदली गेली आहे. या प्रकरणात तब्बल १६ विद्यार्थी अचानक अस्वस्थ झाले आहेत.
आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १४ मुली आणि २ मुलांचा समावेश असून, सर्वांना तात्काळ चिकोडीतील खासगी तसेच तालुका रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच ‘कोड’ परीक्षेच्या आधी या शाळेत अशाच प्रकारची घटना घडली होती. आज पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने पालक आणि स्थानिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. मागील प्रसंगी न्यायाधीशांनी अचानक भेट देत शाळेतील वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले होते.
पूर्वीच्या घटनेत तब्बल १२० विद्यार्थी आजारी पडले होते. आता पुन्हा विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना चिकोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास सुरू आहे.








