- एका ट्रकचा चालक जागीच ठार
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण धडकेत एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रसायनयुक्त सिमेंट वाहून नेणारा ट्रक आणि कांदा घेऊन जाणारा दुसरा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात खळबळ उडाली.

धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात त्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सुमारे ८४२ पोती कांदा रस्त्यावर विखुरला गेला. मोठ्या प्रमाणात कांदा महामार्गावर सांडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. या अपघातात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच रस्त्यावर विखुरलेला कांदा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मृत चालकाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास पोलीस करत आहेत.







