- शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर–नंदगड मार्गावरील हेब्बाळ (ता. खानापूर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हत्तींच्या कळपाने प्रचंड उच्छाद मांडला आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उस पिकाचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेब्बाळ येथील शेतकरी गोपाळ शिनाप्पा गुरव, मल्लारी गुरव आणि यल्लाप्पा गुरव यांच्या मिळून सुमारे दोन एकर ऊस पिकाची हत्तींच्या कळपाने नासधूस केली आहे. या नुकसानीबाबत तात्काळ आणि योग्य भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
हत्तींच्या सतत वाढलेल्या वावरामुळे ग्रामस्थ स्वतः रात्री शेतात पहारा देण्यास भाग पडत आहेत. तरीही वन खात्याकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नुकसानीचा पंचनामा होतो, पण प्रत्यक्ष भरपाई मिळत नाही किंवा मिळली तरी ती तुटपुंजी असते, अशी शेतकऱ्यांची नाराजी आहे.
गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत हत्तींच्या कळपाने भात व ऊस पिकाचे मोठे नुकसान केले असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांत या घटना सतत प्रसिद्ध होत असल्या, तरी तालुक्यातील नेते व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
- शेतकऱ्यांचा सवाल स्पष्ट आहे :
“निवडणुकांवेळी घरोघरी फिरणारे नेते, आता आमच्या प्रश्नांकडे का बघत नाहीत? बेळगाव अधिवेशनात आमदार विठ्ठल हलगेकर आवाज उठवणार की नाही?”
हत्तींचा कळप हातातोंडाशी आलेले भात आणि ऊस पिक मोठ्या प्रमाणात फस्त करत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांनी मौन धारण केल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिक वाढत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत वन विभागाने तातडीने उपाययोजना करून हत्तींचा बंदोबस्त करणे आणि नुकसानग्रस्तांना त्वरित व योग्य भरपाई देणे अत्यावश्यक झाले आहे.







