• काम अपूर्ण असतानाच वाहतूक सुरू झाल्याने ग्रामस्थांची नाराजी

खानापूर / प्रतिनिधी

बेळगाव – पणजी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः लोंढा फाटा परिसरात रस्त्याचे काम सुरू असतानाच ट्रक व जड वाहनांची ये-जा वाढल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून लोंढा फाटा ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता महामार्गाच्या कामामुळे अतिशय खराब व धोकादायक झाला होता. या मार्गालगत लोंढा हायस्कूल व इंदिरा विद्यालय असल्याने शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्याने दररोज ये-जा करावी लागते. महामार्गाच्या कामानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण होते. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी सकाळी लोंढा फाटा येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली.

लोंढा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नीळकंठ उसपकर यांच्याहस्ते पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेले हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रवासी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी खराब रस्त्यामुळे बस सेवा थेट बसस्थानकापर्यंत जात नव्हती, प्रवाशांना लोंढा फाट्यावरच उतरावे लागत होते. आता रस्ता दुरुस्त होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मात्र, डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तसेच रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनांचा वेग वाढणार असून शाळा व फाट्याजवळ अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने गतिरोधक बसवावेत व सूचना फलक लावावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.