बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर विविध प्रसंगी दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात होती. मात्र, काही प्रकरणांतील फिर्यादी तसेच महत्त्वाचे साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने २०१७, २०१८ आणि २०२१ मधील महामेळाव्यांदरम्यान परवानगी न घेता सभा आयोजित केल्याच्या आरोपावरून समितीचे प्रमुख नेते दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले गेले होते.
तसेच ‘सकल मराठा मोर्चा’च्या वेळी ‘महाराष्ट्र’ असा उल्लेख असलेल्या टी-शर्टची विक्री केल्याप्रकरणी शहाजीराजे भोसले आणि मोर्चाचे आयोजक प्रकाश मरगाळे यांच्यावरही स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण खडेबाजार, कॅम्प आणि टिळकवाडी पोलिस ठाण्यात नोंद आहे.
न्यायालयात सुनावणी होत असताना महत्त्वाचे दस्तऐवज व साक्षीदार उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली. संबंधित सर्व आरोपींचे प्रतिनिधित्व ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजीत चौधरी आणि ॲड. रिचमॅन रिकी हे करत आहेत.








