
बेळगाव : मुलांमधील सांगीतिक कौशल्याला वाव देण्यासाठी बेळगावातील प्रथितयश गायिका आणि संगीत शिक्षिका सौ. चंद्रज्योती देसाई आयोजित ‘हसत- खेळत’ संगीत शिबिराचे बुधवार दि. १ एप्रिल रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले.
बुधवार पेठ, टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला विख्यात व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, भजन सम्राट तथा महाराष्ट्र भूषण शंकर पाटील आणि शाळेच्या प्राचार्या नविना शेट्टीगार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती व भारतमाता प्रतिमेचे पूजन तसेच तबला व हार्मोनियम पूजनाने करण्यात आली. यानंतर शिबिराच्या संचालिका सौ. चंद्रज्योती देसाई आणि शंकर पाटील यांच्याहस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जगदीश कुंटे यांनी संगीताचे महत्त्व अधोरेखित करत संगीत ही सर्व कलांची पायाभूत शक्ती असल्याचे सांगितले. संगीतामुळे मानसिक ताण कमी होतो, दुःखात दिलासा मिळतो तसेच आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले. मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी या हेतूने आयोजित शिबिर यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भजन सम्राट शंकर पाटील यांनी संगीतामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगून पालकांनी मुलांचा शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात सौ. चंद्रज्योती देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. श्री. किशोर काकडे यांनी खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास शिबिरातील विद्यार्थी, पालक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







