• झाडशहापूर ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव – खानापूर रोडवरील झाडशहापूरमध्ये असलेले हनुमानाचे जुने मंदिर रस्ता रुंदीकरणावेळी हटविण्यात आले होते. मंदिर बांधण्यासाठी निजलिंगप्पा इन्स्टिट्यूटमध्ये जागा देण्यात आली. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले असले तरी ती जागा अद्याप हनुमान युवक मंडळ ट्रस्टच्या नावे केली नाही. ही जागा तातडीने ट्रस्टच्या नावावर करावी, अशी मागणी झाडशहापूर ग्रामस्थांतर्फे नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

बेळगाव – खानापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध आल्याने झाडशहापूरमधील हनुमान मंदिर हटविण्यात आले. नवीन मंदिर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तरच मंदिर हटवा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. प्रशासनाने मंदिरासाठी निजलिंगप्पा इन्स्टिट्यूटमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यानंतर मंदिर हटविण्यात आले. नवीन जागेत मंदिर उभारण्यात आले आहे. मात्र, ती जागा अद्याप ट्रस्टच्या नावावर केलेली नाही. तेव्हा तातडीने ती जागा ट्रस्टच्या नावे करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला.

यावेळी माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, मोनाप्पा बिर्जे, मल्लाप्पा मर्वे, दीपक गोरल, भरमा गोरल, चांगाप्पा गोरल, प्रकाश धबाळे, मारुती बिर्जे, संतोष लाड, बाबू गोरल आदी उपस्थित होते.