- बी. वाय. विजयेंद्र यांची काँग्रेस सरकारवर टीका
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेस सरकार पाच हमी योजनांच्या गाजावाज्यात सत्तेत आले; मात्र प्रत्यक्षात विकासकामे ठप्प असून सरकार केवळ भ्रष्टाचार, सत्तासंघर्ष आणि घोटाळ्यांपुरते मर्यादित राहिले आहे, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला.
शहरातील सर्किट हाऊस येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या अडीच वर्षांत ‘पंचहमी’ व्यतिरिक्त कोणतेही ठोस काम झाल्याचे दिसत नाही. आमदारांना विकासनिधी मिळत नसल्याने मतदारसंघातील कामे रखडली आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून प्रशासकीय यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच्या आमदारांना परदेशात पाठवून सत्तासंतुलन राखण्याची वेळ सरकारवर आली आहे, ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले.
गरीब, शेतकरी आणि मागासवर्गीयांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला; मात्र त्यांच्या अपेक्षांची फसवणूक झाली आहे. ‘अहिंदा’च्या नावाखाली राजकारण करताना अनुसूचित जाती-जमातींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अल्पसंख्याकांच्या कर्जावरील शंभर टक्के व्याजमाफीच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि इतर घटकांनाही समान न्याय मिळणार का, असा सवाल केला.
मागासवर्गीयांतील सुमारे १.४१ लाख विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगत, रोजगारनिर्मितीच्या आश्वासनाचे काय झाले, किती तरुणांना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हुबळीत रोजगाराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवर पोलिस बळाचा वापर झाल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात २.७५ लाख पदे रिक्त असताना भरती प्रक्रिया का राबवली जात नाही, याबाबत त्यांनी सरकारला जाब विचारला.
पत्रकार परिषदेला आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







