- उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
- सुमारे ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील हलगा गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीची दारू जप्त केली. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला सुमारे ३ लाख ७७ हजार रुपयांचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
हिरेबागेवाडी ते मुत्नाळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सर्व्हिस रोडवरील संशयित शेडवर निरीक्षक ढुंडप्पा हक्की यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. या धाडीत ५५३.९६ लिटर गोवा बनावटीची दारू तसेच २३.४०० लिटर बिअर असा मोठा साठा आढळून आला. अवैध विक्रीच्या उद्देशाने हा माल ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी मुत्नाळ येथील २१ वर्षीय अरुण राजू वाघमोरे याला बीएनएसएस कायद्यान्वये चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित शेडच्या मालकाचा शोध सुरू असून कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उपअधीक्षक रवी एम. मुरगोड व अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संपूर्ण मोहीमेचे चित्रीकरण करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.








