खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींचा कळप थैमान घालत असून, गावातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हलसाल येथील शेतकरी मारूती मष्णु तांबुळकर यांच्या ‘थोरले शेत (भटाच शेत) ‘ येथे हत्तींच्या कळपाने मोठे नुकसान केले आहे. त्यांच्या सुमारे वीस पोती भातपिकाचे हत्तीने पूर्णपणे चिरडून टाकले असून, हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तसेच शेतकरी लक्ष्मण गंगाराम तांबुळकर यांच्या शेतातील सुमारे १० पोती भातपिकाचे, तर कुमार पंकज पुंडलिक तांबुळकर यांच्या शेतातील सुमारे १० पोती भातपिकाचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले आहे. या घटनेमुळे गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हत्ती आपल्या शेताकडे येत असल्याची माहिती मिळताच गावातील दहा-पंधरा शेतकरी फटाक्यांच्या आवाजाने हत्ती पळवण्यासाठी फटाके घेऊन एकत्र आले होते. मात्र, हत्तीनी चतुराईने शेतकऱ्यांना चकवा देत, ते थांबलेल्या ठिकाणापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर असलेल्या मारुती तांबुळकर यांच्या शेतात घुसून नुकसान केले. शेतकऱ्यांना याची कल्पनाच झाली नाही आणि काही वेळातच त्यांनी आपले पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले. स्थानिक शेतकऱ्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, अलीकडेच सुलेगाळी येथे दोन हत्तींच्या मृत्यूच्या प्रकरणी शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती, त्याच धर्तीवर आता “शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या वन अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी’ अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, वन विभाग हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. रात्रीच्या वेळी हत्तींचे कळप गावात घुसतात, शेती उद्ध्वस्त करतात, परंतु कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नाही.
या घटनेनंतर हलसाल आणि आसपासच्या परिसरात हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतकरी म्हणत आहेत की, “आम्ही दिवसरात्र शेतीत कष्ट करतो, पण हत्ती एका रात्रीत सर्व नष्ट करून जातात. आम्हाला नुकसानभरपाई मिळाली नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.” वन खात्याने तातडीने उपाययोजना करून हलसाल परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे, अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे.








