• महिला – बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन

बेळगाव / प्रतिनिधी

अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांना वेतन देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे.

रविवारी, बेळगाव येथील त्यांच्या गृहकार्यालयात विश्वभारत सेवा समितीने निवृत्त शिक्षक, यशस्वी शिक्षक आणि यशस्वी शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिक्षक आणि शेतकऱ्यांचा सत्कार केला. अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी मला अनुदानित शाळांमधील अतिथी शिक्षकांना सरकारकडून वेतन मिळवून देण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यावर चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करतील, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या.

शिक्षकाचे स्थान लहान नसते, सामान्य माणसापासून ते राष्ट्रपतींपर्यंत सर्वांच्या कामगिरीमागे शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. म्हणूनच, समाजात शिक्षकांना खूप आदर आहे. शिक्षकांमुळेच मी या पदावर पोहोचले आहे. शिक्षकांनी दिलेली संस्कृती आणि वारसा मी कधीही विसरले नाही. म्हणून, मी नेहमीच शिक्षकांची आभारी आहे, असे त्या म्हणाल्या. विश्व भारत सेवा समिती गेल्या ६६ वर्षांपासून उत्तम काम करत आहे. या संस्थेने अनेकांना उज्ज्वल भविष्य दिले आहे. या संस्थेला आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी तयार आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजया नंदीहळ्ळी, शिक्षण अधिकारी अंजनेय आर.के., मनोहर बेळगावकर, यल्लाप्पा बेळगावकर, बसवराज हट्टीहोळी, बाळकृष्ण तेरसे, यशवंत सोनार आणि इतर उपस्थित होते.