- पार्श्वगायक मोहित चौहानच्या मैफलीने तरुणाई रंगली
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक लॉ सोसायटीच्या जीआयटी कॉलेजमध्ये आयोजित ‘ऑरा’ या नॅशनल फेस्टचा समारोप प्रख्यात पार्श्वगायक मोहित चौहानने यांच्या सुरेल मैफलीने रंगतदार वातावरणात पार पडला. कॉलेजच्या मैदानावर जमलेल्या तरुणाईने मोहित चौहान यांच्या गाण्यांवर ठेका धरत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या सुरेल आवाजामुळे संपूर्ण परिसर संगीताच्या लयीत न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात जब वुई मेट या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘जो भी मै’ सादर करून करण्यात आली. त्यानंतर ‘ये दूरियां, ये राहों की दूरियां’ यांसारखी गाणी गात त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. काही गाणी सादर करताना त्यांनी प्रेक्षकांनाही साथ देत गायला लावले, त्यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले. ‘ब्लास्ट फ्रॉम द पास्ट’ या सादरीकरणातून जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे मुखडे सादर करून त्यांनी प्रेक्षकांना वेगळाच आनंद दिला.
उत्कृष्ट वाद्यवृंद, दर्जेदार साउंड सिस्टीम आणि रंगमंचावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मैफलीला भव्यता लाभली होती. कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना मोहित चौहान यांनी बेळगावला पहिल्यांदाच भेट दिल्याचे सांगत शहराच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केले. त्यांच्या या सुरेल कार्यक्रमाने ‘ऑरा’ फेस्टची सांगता अविस्मरणीय ठरली.








