• डांबरीकरणानंतर वाहने सुसाट ; वेगाने मर्यादा ओलांडल्या
  • अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी
  • हिंडलगा – तुरमुरी पट्ट्यात तातडीने सुरक्षात्मक उपाययोजनांची गरज

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव–वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा ते तुरमुरी या पट्ट्यात डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने रस्ता पूर्णपणे गुळगुळीत झाला आहे. मात्र गतिरोधकांचा अभाव आणि वाढलेला वाहनांचा वेग यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे या मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

हिंडलगा कारागृहापासून सुळगा पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून तुरमुरीपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाले आहे. काम अंतिम टप्प्यात असले तरी अनेक ठिकाणी किरकोळ कामे प्रलंबित आहेत. विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अद्याप झालेल्या नसल्याने वाहनचालक सुसाट वेगाने धावत आहेत.

तुरमुरी ते हिंडलगा वनखात्याच्या तपासणी नाक्यापर्यंत एकही गतिरोधक नसल्याने धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. आंबेवाडी फाटा, सुळगा बसस्थानक, सुळगा हनुमान मंदिर परिसर, बेळगुंदी कल्लेहोळ फाटा, उचगाव फाटा आणि तुरमुरी बसस्थानक या ठिकाणी गतिरोधकांची अत्यंत गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वी असलेले काही गतिरोधक नव्या डांबरीकरणावेळी हटविण्यात आले; मात्र त्यांची पुनर्बांधणी अद्याप झालेली नाही. परिणामी वळणांवर आणि फाट्यांवर अपघाताचा धोका वाढला आहे.

  • तुरमुरी ते राज्य सीमेपर्यंत काम रखडले :

हिंडलगा ते तुरमुरी बसस्थानकापर्यंत रस्ता सुस्थितीत असला तरी तुरमुरी ते बाची येथील कर्नाटक–महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा मार्ग अद्याप दुरवस्थेत आहे. पावसाळ्यात मोठे खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

सदर पट्ट्यातील डांबरीकरण व रुंदीकरण लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काम रखडल्याने कर्नाटक–महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी तुरमुरी ते राज्य सीमेपर्यंतचे काम पूर्ण करून संपूर्ण मार्ग सुरक्षित व सुकर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.