बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल आणि कोंडसकोप क्रॉस जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेत विचित्र वर्तन करणाऱ्या दोघा जणांना काल मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे नदीम हुसेनसाब देसाई (वय ३३, रा. शिवाजीनगर पहिला क्रॉस, बेळगाव) आणि निबिल बसवराज हुंवन्नावर (वय २०, रा. बस्तवाड, बेळगाव) अशी आहेत.

यापैकी नदीम देसाई हा शहरातील कोल्हापूर सर्कल जवळ सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करताना आढळून आला. तेंव्हा त्याने कोणती तरी नशा केल्याचे आढळून येताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीमला ताब्यात घेतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी त्याने गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निबिल हा बस्तवाड गावाच्या हद्दीतील कोंडसकोप क्रॉस नजीक बसथांब्याजवळ सार्वजनिक ठिकाणी नशेमध्ये विचित्र वर्तन करत होता. तेंव्हा त्याला हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले असता वैद्यकीय तपासणी त्याने देखील गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मंगळवार पेठ टिळकवाडी येथील सार्वजनिक उद्यानामध्ये दारू पीत बसलेल्या एकाला टिळकवाडी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अशोक गुंडू भजंत्री (वय ३१, मुळ रा. भजंत्री गल्ली नंदगड, सध्या आंबेडकरनगर कोनवाळ गल्ली, अनगोळ, बेळगाव) असे आहे. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

बेळगाव ‘तालुक्यातील कुकडोळ्ळी – गजपती रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मटका जुगारावर लोकांचे पैसे लावणाऱ्या एका मटका बुकिला हिरेबागेवाडी पोलिसांनी काल अटक केली. अटक केलेल्या मटकाबुकीचे नाव भीमाप्पा सिद्धाप्पा नाईक (वय ५०, रा. लक्ष्मीनगर, काकती बेळगाव) असे आहे. भीमाप्पा हा काल मंगळवारी कुकडोळ्ळी -गजपती रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कल्याण ओसी मटका जुगारावर लोकांचे पैसे लावत होता. त्यावेळी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून भीमप्पा याला रंगेहात ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळून रोख १३०० रुपये आणि मटक्याचा चिठ्ठया जप्त केल्या. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.