बेळगाव / प्रतिनिधी

आपल्या घरासमोर खेळणाऱ्या एका बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. हल्ल्यात सहा वर्षाची बालिका जखमी झाली आहे. सोमवारी दुपारी गणेशपुर येथे ही घटना घडली आहे. एकाच वेळी तीन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला आहे. प्राविण्या शुभम भोयर (वय ६) रा. गणेशपूर असे जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आपल्या घराजवळच ही बालिका खेळत होती. त्यावेळी तीन भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले.

प्राविण्याचे वडील लष्करी सेवेत आहेत. ही घटना घडली त्यावेळी तिचे कुटुंबीय घरात होते. तिचा आरडाओरडा ऐकून सर्वजण त्या दिशेने धावले. त्यांनी कुत्र्यांना हटकले. तोपर्यंत कुत्र्यांनी प्राविण्‍यावर हल्ला केला होता.

गेल्या आठ दिवसांपासून गणेशपूर परिसरात सातत्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरूच असून दोन दिवसांपूर्वी एका लहान मुलावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले.