बेळगाव / प्रतिनिधी
पाटील गल्ली, रामघाट रोड, गणेशपूर येथील एका महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद अलका पाटील झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अलका बसवंत पाटील (वय ५०) असे तिचे नाव आहे. मानसिक अस्वस्थपणामुळे या महिलेने आपले जीवन संपविल्याचे सांगण्यात आले. आरोग्य समस्या व मुलींचे लग्न कसे करायचे? या विचारातून आलेल्या ताणतणावामुळे रविवार दि. २१ डिसेंबर रोजी पहाटे जवळच असलेल्या शेतवडीतील विहिरीत उडी टाकून आपले जीवन संपविले आहे.
घटनेची माहिती समजताच कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक जे. एस. मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एचईआरएफ रेस्क्यू पथकाचे प्रमुख बसवराज हिरेमठ, अभिषेक यळ्ळूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. केवळ १५ ते २० मिनिटात विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.







