बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात शनिवारी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी, त्याचबरोबर श्री मूर्ती विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडावी याबाबत संपूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, शनिवारी बेळगाव पोलीस आयुक्तालय अखत्यारीतील तब्बल १००० श्री मूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनस्थळी महापालिकेच्या सहकार्याने योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी लाईफ जॅकेटही तैनात करण्यात आले आहेत. हेस्कॉम अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकाश व्यवस्था सुसज्जित ठेवण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणच्या विद्युत तारांबद्दल दक्षता घेण्यात आली आहे. पार्किंग स्थळांच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. विसर्जन मिरवणूक काळात शहरातील रहदारीचे नियोजन सुव्यवस्थित राहण्यासाठी बेंगळूरूहून विशेष पथक येणार आहे.

कपिलेश्वर येथील जुन्या आणि नव्या तलावात सर्वाधिक संख्येने श्रीमूर्तींचे विसर्जन होत असते. त्यामुळे या ठिकाणी मिरवणूक खोळंबून राहते. विसर्जन मिरवणूक संपायला मोठा विलंब होतो.याकडे लक्ष देऊन काही मंडळांना त्यांच्या जवळच्या तलावाजवळ श्री मुर्ती विसर्जना संदर्भात कळविण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बीचा आवाज नियंत्रित राहण्याबाबत मंडळांना कळविण्यात आले आहे. मिरवणुकीत फटाके वाजवल्याने अनर्थ घडू शकतो. याची काळजी घेत मिरवणुकीत फटाके वाजविले जाऊ नयेत. मोकळ्या जागेत फटाके वाजविले जावेत. याबाबतही सर्वांना माहिती देण्यात आली आहे.

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील हे बेळगावला आले आहेत. बेळगावसह इतर अन्य ठिकाणाहून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस निरीक्षक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह,जलद कृती दलाची तुकडी गृह रक्षक दलाचे जवान विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत असेही बोरसे यांनी स्पष्ट केले.