बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील बेळगावात आले असून, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. बेळगावमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. शेवटच्या दिवशी लाखो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. यात बेळगाव, धारवाड, बागलकोट, विजापूर तसेच कर्नाटकच्या इतर जिल्ह्यांसोबतच महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सरकारने संदीप पाटील यांची बेळगावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आयजीपी संदीप पाटील यांनी बेळगाव शहरात आल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि यापूर्वी ते बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना शहरासह जिल्ह्यात कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था हाताळत होते, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी बेळगावातील कपलेश्वर मंदिराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. तसेच, गणेश विसर्जन तलाव आणि मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी केली. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते. बेळगावला आलेल्या संदीप पाटील यांचा दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सत्कार केला. यावेळी मनोहर मुंचडिकर, आनंद कोलकार, पांडू गिडन्नवर, संतोष तळवार, बाबू दोडमनी, सुरेश तळवार, कल्लप्पा कांबळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.