• सजावटीच्या आकर्षक साहित्याने सजली बाजारपेठ
  • गणेशोत्सव दोन दिवसांवर ; प्लास्टिक माळा, मोत्यांचे हार, मखर, पाट, चौरंगांची रेलचेल

बेळगाव / प्रतिनिधी

गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून, बाप्पाच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. – गणेशोत्सवदेखील अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे मखर, सजावट, बाप्पाची आरास, सजावटीसाठी लागणारी तोरणे, फुलांच्या माळा, पडदे , झालर, इलेक्ट्रॉनिक्स तोरणे, लाईट्स, धूप, पूजा साहित्य (कापूर, अगरबत्ती) यांसह गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्याने शहर आणि उपनगरी भागातील सर्वच बाजारपेठा सजल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात या साहित्याची चढ्या दराने विक्री केली जाते. त्यामुळे आतापासूनच या साहित्याची खरेदी केली जात आहे.

शहरात गणपत गल्ली , पांगुळ गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, शनिवार खूट आदी ठिकाणी मखर विक्रीसाठी ठेवले आहेत. मखराच्या प्रकारातही विविधता दिसून येत आहे. बाजारात थर्माकोलसह कापडी आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले  मखरही आले असून  ग्राहकांना ते आकर्षित करत आहेत. साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. बाजारात प्लास्टिक माळा, मोत्यांचे हार, थर्माकोल आणि पाट, चौरंग यांची रेलचेल आहे.

गणरायाच्या स्वागतामध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी भक्तांची धडपड दिसून येत आहे. बेळगावसह आसपासच्या भागातील आणि गोवा येथील गणेश भक्तांची देखील वर्दळ शहरात वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिली असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.

सध्या घरगुती गणेशोत्सवा बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. श्री गणेश चतुर्थीच्या अगोदर दोन दिवस खरेदीसाठी बाजारपेठेत नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. विविध प्रकारचे शोभीवंत साहित्य खरेदीकडे ग्राहकांचा ‘ओढा दिसून येत आहे. बाजारात एलईडीचा वापर करून तयार केलेले झुंबर, रंगीबेरंगी फुलांच्या विद्युत रोषणाईच्या माळा, एलईडी क्रिस्टल, चक्र, लोट्स बल्ब, स्टार मिनी लॅम्प अशा विविध प्रकारच्या माळा विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तसेच एलईडी समया, पणत्या, झालर लाईट्स, मल्टिकलर फोकस माळा, रोप, विद्युत रोषणाई माळा वजनाने हलक्या आणि स्वस्त असल्यामुळे अशा माळांना यंदा अधिक मागणी आहे. सध्या मंडप उभारणी सुरू आहे. मंडळेही लायटिंग करण्यावर अधिक भर देत आहेत. शहराच्या मुख्य बाजारपेठेत प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर सजावटीचे साहित्य लावले आहे. या साहित्यामुळे बाजारपेठेत झगमगाट दिसून येत आहे.

श्री गणेशमूर्ती शाळांमध्येही श्रींच्या मूर्तीचे रंगकाम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांचा महाउत्सव श्री गणेश चतुर्थी सण बुधवार २७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. घराघरांत आणि सार्वजनिक स्वरूपात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सध्या घराघरांत गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. घराची साफसफाई, रंगकाम, डेकोरेशन आदी कामे सुरू आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणी आणि इतर कामांनी देखील गती घेतली आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर चार दिवसांपासून दूरवर नेल्या जाणाऱ्या श्रींच्या मूर्ती शाळांमधून नेल्या जातात. त्यामुळे मूर्ती शाळांमध्ये गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे.