बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गांधीनगर (राष्ट्रीय महामार्ग) ते धर्मवीर संभाजी महाराज चौक दरम्यान उड्डाणपूल बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अशोक सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल आणि राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जाणारा हा उड्डाणपूल २.०३ किलोमीटर लांबीचा असेल. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, तो शहरातील रहदारी समस्येवर महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.

हुबळी येथील व्हीएलएस कन्सल्टंट्सने यापूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार, संकम हॉटेल ते धर्मवीर संभाजी चौक दरम्यान सुमारे ३.६ कि.मी. लांबीचा पूल प्रस्तावित होता. जोडरस्त्यांसह संपूर्ण कॉरिडॉरची लांबी सुमारे ४.५ कि.मी. असून तो अशोक सर्कल व आरटीओ चौक मार्गे राणी चन्नम्मा चौकाला जोडतो.

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या २.०३ कि.मी. लांबी आणि पूर्वीच्या डीपीआरमधील फरक आगामी अंमलबजावणी व निविदा प्रक्रियेदरम्यान स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.