बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरुचं आहे. अंमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या पाच व्यक्तींविरुद्ध बेळगाव पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी कॅम्प पोलिसांनी दोघाना ड्रग्जच्या नशेत गैरवर्तन करताना अटक केली. देशपांडे कट्टा परिसरातील रहिवासी शेख (वय २८) याला मशिदीजवळील बसस्थानक परिसरातून, तर सर्कुलर स्ट्रीट, कॅम्प येथील इरफान मेहबूब चिस्ती (वय ३४) याला रेल्वे स्टेशनजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद वानकुद्रे व त्यांच्या पथकाने दोघांची वैद्यकीय तपासणी करून संबंधितांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तसेच, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदरअली चौक, पिरणवाडी येथील अनयार बाबाजान काझी (वय २८) आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पिरणवाडी येथील अयान शफिउल्ला सौदागर (वय १८) यांना टिपू सुलतान नगर क्रॉस येथे अंमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पीएसआय लक्कप्पा जोदन्ना, संतोष दलवाई आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.
दरम्यान, २५ ऑक्टोबर २०२५ रोजी माळमारुती पोलिसांनी न्यू गांधी नगर पहिला क्रॉस परिसरात रियान दस्तगीर मोकाशी (वय २१) याला अंमली पदार्थ सेवनाच्या गुन्ह्यात अटक केली. ही कारवाई पीएसआय यू.टी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बेळगाव पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.








