• म. ए. समिती नेत्यांसह १५० जणांवर एफआयआर दाखल

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाप्रश्नी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या म. ए. समिती नेत्यांसह १५० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलिस स्थानकाकडून सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली असून सायकल फेरीत सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एक नोव्हेंबर रोजी मूक फेरीच्या माध्यमातून मराठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जाण्याचा आपला हक्क दाखविला होता. कार्यकर्त्यांनी शांततेत सायकल फेरी काढली होती. शनिवार सकाळी महाद्वार रोड येथील छत्रपती संभाजी उद्यानातून फेरीची सुरुवात झाली होती.

मार्केट पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली आहे. कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून परवानगी न घेता फेरी काढल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच मार्गावर अडथळा निर्माण करून उपद्रव केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. फेरीत कार्यकर्त्यांनी सरकार व कर्नाटक प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करणारे घोषवाक्य दिल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र बाजूने घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांच्या शांततेचा भंग झाला आहे. बेळगावसह सीमाभागातील गावे महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी केली असे सांगत कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हटले आहे की, आम्ही शांततेत मूक फेरी काढली, तरी सरकारतर्फे एफआयआर दाखल करून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न होत आहे.”

या प्रकरणी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण पाटील, नेताजी जाधव, ॲड. अमर येळ्ळूरकर, प्रशांत भातकाडे, अंकुश केसरकर, मदन बामणे, किरण गावडे, महेश नाईक, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, श्रीकांत कदम, चंद्रकांत कोंडुसकर, प्रकाश शिरोळकर, वैशाली भातकाडे, गजानन पाटील, जयेश भातकाडे, किरण हुंदरे, संतोष कृष्णाचे, गुंडू कदम, हनुमंत मधुकर, शिवाजी मंडोळकर, ॲड. महेश बिर्जे, सुहास हुद्दार, उमेश कुर्याळकर, जोतिबा पालेकर, बाबुराव केरवाडकर, विश्वजित चौगुले, विशाल सिद्धार्थ भातकाडे, निहाल शहापूरकर, विठ्ठल पाटील, येल्लारी बिडकर आदी ३५ जणांच्या नावांचा उल्लेख आहे. एकूण १०० ते १५० मराठी कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८९ (२) १९२, २९२, २८५, २९३, १९० अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.