नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनाव तसेच निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने ही सुनावणी सकाळी साडेअकरा वाजता घेण्याचे निश्चित केले असून, त्या दिवशी इतर कोणतेही कामकाज न ठेवण्याचे निर्देश न्यायालयीन निबंधकांना दिले आहेत. या निर्णयामुळे ठाकरे गटाला काहीशी निराशा झाली आहे, कारण सुनावणी आणखी काही दिवस लांबणीवर गेली आहे.

खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, या दोन्ही पक्षांच्या याचिकांवर दिवसभर सुनावणी घेतली जाईल, आणि आवश्यकतेनुसार दुसऱ्या दिवशीही ती पुढे चालू ठेवली जाऊ शकते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या पक्षनाव आणि चिन्हावरील वादावर जानेवारी अखेरीस निर्णय येण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन, ठाकरे गटाच्या वतीने वकील देवदत्त कामत यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने “धनुष्यबाण” हे चिन्ह वापरले होते, आणि स्थानिक निवडणुकांमध्ये त्याचाच वापर होऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.मात्र, आता सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्याने शिंदे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची मुभा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

बुधवारी या याचिका न्यायालयात आल्यानंतर वरिष्ठ वकील देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी खंडपीठाकडे लवकर निर्णय घेण्याची विनंती केली.