खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील हुळंद गावात रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या माळरानावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात स्थानिक शेतकरी वासुदेव नारायण गावडे गंभीर जखमी झाले.

या हल्ल्यात गावडे यांच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी गावडेंना जांबोटी येथे प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान काही माध्यमांवर गावडे यांचा डोळा निकामी झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या, मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यानंतरच डोळ्याच्या स्थितीबाबत निश्चित माहिती मिळू शकेल.