- मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत ठराव
- सीमा समन्वय मंत्र्यांना देणार निमंत्रण
बेळगाव / प्रतिनिधी
भाषावार प्रांतरचनेनंतर मराठी भाषिक भूभाग कर्नाटकाला जोडण्यात आला. याच्या निषेधार्थ दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी मूकफेरी काढून केंद्र सरकार विरुद्धचा आपला रोष मराठी भाषिक व्यक्त करतात. या मूकफेरीच्या परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. परवानगी मिळो न मिळो तसेच कोणीही आव्हान दिले तरी काळ्यादिनादिवशी मूकसायकल फेरी काढण्याचा ठराव मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. ॲड. महेश बिर्जे यांनी काळ्यादिनाबाबतच्या जनहित याचिकेबाबत माहिती दिली. तसेच मुंबई येथे झालेली तज्ञ समितीच्या बैठकीचा वृत्तांत त्यांनी सादर केला. सर्व घटक समित्यांनी बैठका घेऊन काळादिन यशस्वी करण्यासंदर्भात जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने सीमावासियांच्या वेदना जवळून जाणून घेण्यासाठी सीमा समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली. परंतु अनेक महिने उलटले तरी सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी बेळगावला भेट दिलेली नाही.
त्यामुळे निदान १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनाच्या फेरीवेळी उपस्थित राहावे यासाठीचे निमंत्रण मध्यवर्तीच्यावतीने पाठविण्यात येणार असल्याचा ठराव मांडण्यात आला. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तज्ञ समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये प्रत्येक घटक समित्यांचा एक सदस्य देण्यात येणार आहे. यासाठी घटक समित्यांनी बैठक घेऊन एका सदस्याचे नाव मध्यवर्ती म. ए. समितीकडे पाठवून देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच अल्पसंख्यांक आयोगाच्या उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठवूनही त्यांच्याकडून कोणतेच उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मध्यवर्तीकडून अल्पसंख्याक आयोग तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, ॲड. महेश बिर्जे, गोपाळ देसाई, रणजीत चव्हाण-पाटील, बी. डी. मोहनगेकर, मोनाप्पा पाटील, रणजीत पाटील, लक्ष्मण होनगेकर, रावजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, मल्लाप्पा गुरव यांसह मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.
- करवे तसेच पोलीस प्रशासनाचा निषेध :
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी रविवारी कन्नड रक्षण वेदिकेचा म्होरक्या बेळगावमध्ये आला होता. यावेळी त्याने म. ए. समिती तसेच मराठी भाषिकांबाबत बेताल वक्तव्य करत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. दोन भाषिकांमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करूनही पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. उलट प्रत्युत्तर देणाऱ्या युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे करवेचा म्होरक्या तसेच पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात निषेधाचा ठराव मांडण्यात आला.