- सीमाभागातील साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेण्याची गरज : विश्वास पाटील
बेळगाव : सीमाभागात दर्जेदार आणि सकस मराठी साहित्यनिर्मिती होत असतानाही आजवर त्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही. मात्र, यापुढे अशी उपेक्षा होऊ नये, याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे, असे मत पानिपतकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
ईश्वरपूर येथे रविवारी श्री शिवाजी वाचनालय, कामेरी यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद व कामेश्वरी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी सीमाभागातील साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांना मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
या संमेलनाचे उद्घाटन श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर कादंबरीकार दि. बा. पाटील, रंगराव बापू पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. विनोद गायकवाड यांनी सांगितले की, सीमाभागातील साहित्यिक म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला, याबद्दल ते कृतज्ञ आहेत. सीमाभागात अनेक साहित्यिक सातत्याने दर्जेदार मराठी साहित्यनिर्मिती करत असून, त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हा सन्मान स्वीकारत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या पुरस्कारामागे दि. बा. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचा पाठिंबा असणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.








