• १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त शहरात भव्य मिरवणूक

बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनी आज मिरवणूक मार्गाची पाहणी केली. जयंती सोहळ्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

महान बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाणार आहे. त्या अनुषंगाने महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत तयारीचा आढावा घेतला.

महापौर प्रीती कामकर यांनी सांगितले की, जयंती महामंडळासोबत प्राथमिक बैठक पार पडली असून, सोहळा थाटामाटात पार पाडण्यासाठी महापालिका सज्ज आहे. उपमहापौर हनुमंत कोंगळी यांनीही दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणत्याही अडथळ्याविना मिरवणूक पार पडण्यासाठी सर्व व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी उद्यानातील जुना पुतळा काढून त्याजागी नवीन पुतळा लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

दरम्यान, दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी विविध विभाग आणि महापालिका सहकार्य करत असून, यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू आहे.