• २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर तब्बल रू. १,२५,००० /-
  • सर्वसामान्यांना फटका : लग्नसराईत बजेट कोलमडणारं

बेळगाव / प्रतिनिधी

महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या सामान्य जनतेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. साधारणपणे १७ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होईल आणि या काळात सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

शहरातील सराफी बाजारात सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल १,२५,००० इतका झाला आहे. काही महिन्यांपूर्वी हेचं सोने लाखाच्या घरात होते. गेल्या काही महिन्यांत बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच दर वाढू लागले आणि आता ते उच्चांक गाठत आहेत. दर कमी असताना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जात होते. परंतु आता दर वाढल्याने खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे.

  • ग्राहकांची हतबलता :

प्रतिक्रिया : सौ. माधुरी जाधव (समाजसेविका) 

दिवाळी आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढत असते. दिवाळीनंतर लग्नसराई सुरु होते. “घरातील लग्नसराईत सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र आणि दागिने खरेदी करणे भाग आहे. पण सोन्याचे सध्याचे भाव पाहता हात आखडता घ्यावा लागत आहे. आवश्यक तितकेच सोने घेता येते, बाकी इच्छा असूनही मागे हटावे लागत आहे.” सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील भू-राजकीय तणाव आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली आहे. या वाढत्या दरांचा थेट परिणाम दिवाळीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. याशिवाय झटपट पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारीचे (चोरी, लुटमारी) प्रकार वाढण्याचा धोका आहे.