- काळविटांच्या मृत्यू प्रकरणी घेतली माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला अचानक भेट देत प्राणीसंग्रहालयातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. अलीकडेच मोठ्या संख्येने काळविटांचे मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली.
यावेळी मंत्र्यांनी प्राणीसंग्रहालयातील आरएफओ, पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन काळवीटांच्या मृत्यूकडे नेणाऱ्या कारणांचा आढावा घेतला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , काळविटांचा मृत्यू विशिष्ट संसर्गजन्य आजारामुळे झाला असण्याची शक्यता प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाली आहे. हा आजार इतर प्राण्यांपर्यंत पसरण्याची अत्यल्प शक्यता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. बेंगळुरू येथून बोलावण्यात आलेल्या विशेष तज्ज्ञ पथकाने संसर्ग झालेल्या काळविटांवर उपचार करण्यासोबत प्राणीसंग्रहालयातील संपूर्ण परिसराची तपासणी केली आहे.
मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना प्राण्यांची देखभाल, स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाय, पाण्याची गुणवत्ता आणि खाद्य व्यवस्थापन या सर्व बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. उर्वरित प्राणी विशेषतः वाघ, सिंह व इतर वन्यप्राणी पूर्णपणे सुरक्षित राहतील यासाठी सतत वैद्यकीय निरीक्षण ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय विभागाने सांगितले की संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने औषधोपचार सुरू केले आहेत. सर्व पिंजरे, परिसर व खाद्यपदार्थ निर्जंतुक करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणाच्या टप्प्यात आली असून उर्वरित प्राणी स्थिर स्थितीत आहेत. मंत्री जारकीहोळी यांनी मृत काळविटांबाबत सखोल चौकशी करून आवश्यक ती सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीदरम्यान एसीपी नागराज बळेहोसुर, कर्नाटक प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुनील पनवार, मंजुनाथ चव्हाण, डीपीओ क्रांती एन. ई., डॉ. प्रयाग यांसह प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








