- दहा दिवसात पीक कर्ज वाटप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांपासून मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आलेले नाही. दहा दिवसांत कर्ज वाटप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुतगा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. आज शनिवारी श्री रामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली मुतगा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर केले.

याप्रसंगी बोलताना श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर म्हणाले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४,५०० कोटी रुपयांचे पीक कर्ज दिले आहे. मात्र, मुतगा प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीकडून गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले नाही. ते दोन वर्षांपासून सतत आंदोलन करत आहेत. लोकप्रतिनिधींनी यावर प्रतिक्रिया देत कर्ज देणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापपर्यंत कर्ज मिळालेले नाही. जर शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्ज दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांनी दिला. यावेळी मुतगा गावातील पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.