• खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव कॅन्टोन्मेंट अखत्यारीतील नागरी क्षेत्र महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली.

बेळगावचे खासदार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार बेळगाव कॅन्टोन्मेंट अखत्यारीतील नागरी क्षेत्र बेळगाव महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवर चर्चा केली.

खासदारांनी यावेळी केंद्रीय मंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला की बेळगाव कॅन्टोन्मेंट अखत्यारीतील ओळखला जाणारा नागरी परिसर,बेळगाव महापालिकेला हस्तांतरित करण्याबाबतची व्यापक माहिती कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव आणि नवी दिल्ली येथील संरक्षण विभागाचे सचिव यांना आधीच पाठवण्यात आली आहे. या शिवाय,बेळगावमध्ये संरक्षण उत्पादन उद्योग उभारण्यासाठी जमीन व अन्य सुविधा उपलब्ध असल्याने या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.